Chandanjhira Murder Case : जालन्यात युवकाची चाकूने निर्घृण हत्या

चंदनझिरा परिसर हादरला! एकता चौकात युवकाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या

चंदनझिरा हत्या प्रकरणात जखमी युवकाला रुग्णालयात आणल्यानंतरचे दृश्य

जालना | प्रतिनिधी:
जालना शहरातील चंदनझिरा परिसर गुरुवारी रात्री रक्तरंजित हत्याकांडाने हादरला. एकता चौकात एका युवकाची धारदार शस्त्राने सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर परिसरात मोठी दहशत पसरली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार जुन्या वादातून हा खून झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

मृत युवकाचे नाव जितेंद्र रवी अडसूळ उर्फ जितू आरसोड (वय 35, रा. बदनापूर) असे आहे. तो चंदनझिरा येथील जावई असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार जितेंद्र हा पत्नीला घेण्यासाठी चंदनझिरा परिसरात आला होता. यावेळी त्याचा सासरा आणि मेहुण्यासोबत काही कारणावरून वाद झाला होता. याच वादाचे पुढे हिंसक रूपांतर झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार एकता चौक परिसरात अचानक काही हल्लेखोरांनी जितेंद्र अडसूळ याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढवला. हल्लेखोरांनी त्याच्यावर सपासप वार केले. गंभीर जखमी झालेला जितेंद्र रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर कोसळला. नागरिकांनी मदतीचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार मृताच्या शरीरावर चार ते पाच धारदार शस्त्राचे गंभीर घाव आढळून आले आहेत. विशेषतः छाती आणि पोटावर वार करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. नेमके किती वार झाले याबाबत शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट माहिती समोर येणार आहे.

घटनेनंतर चंदनझिरा परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. माहिती मिळताच चंदनझिरा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची पाहणी करून पंचनामा केला तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात पाठवण्यात आला.

दरम्यान जालना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ड्युटीवर असलेल्या डॉक्टर मुलगीर यांनी सांगितले की, “जखमी युवकाला रात्री सुमारे 8 वाजून 15 मिनिटांनी रुग्णालयात आणण्यात आले होते. तपासणीदरम्यान त्याच्या छातीच्या डाव्या बाजूला तसेच पोटात चाकूचे गंभीर वार आढळले. संपूर्ण तपासणीनंतर त्याला मृत घोषित करण्यात आले. पुढील प्रक्रिया म्हणून पोलिसांना माहिती देण्यात आली असून शवविच्छेदन शुक्रवारी सकाळी करण्यात येणार आहे.”

या प्रकरणाचा तपास पोलिसांनी वेगाने सुरू केला आहे. आरोपींच्या शोधासाठी दोन विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक माहितीच्या आधारे तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. मात्र हत्येमागील नेमके कारण अद्याप अधिकृतरीत्या स्पष्ट करण्यात आलेले नाही.

या घटनेनंतर चंदनझिरा परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नुकतेच पदभार स्वीकारलेले पोलीस अधीक्षक तेबीरसिंह संधू यांच्यासमोर शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. शहरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांवर पोलीस प्रशासन कोणती कठोर पावले उचलते याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Also Read : तरुणीचे फोटो काढून धर्मांतराचा दबाव; मुख्य आरोपीसह भावाला अटक

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या