बनावट कागदपत्रांद्वारे जालन्यातील ५ एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न उघड; न्यायालयाच्या आदेशावरून ५ जणांवर गुन्हा दाखल

जालना सर्व्हे ५५४ जमीन फसवणूक प्रकरण — ५ आरोपींवर गुन्हा दाखल, सरकारी अधिकाऱ्यांचा सहभाग

जालना | लोकप्रश्न न्यूज | २६ एप्रिल २०२६ :

जालना शहरातील मंठा रोडवरील डी-मार्टच्या बाजूला असलेल्या सर्व्हे क्रमांक ५५४ मधील तब्बल ५ एकर मौल्यवान शेतजमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे हडपण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी जालना न्यायालयाने गंभीर दखल घेत दोन माजी सरकारी अधिकाऱ्यांसह एकूण ५ जणांविरुद्ध फौजदारी गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार २४ एप्रिल २०२६ रोजी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकरण काय आहे?

जालना येथील कृषी आणि बांधकाम व्यावसायिक अंकित अभयकुमारजी आबड (वय ३३, रा. नळगल्ली, जालना) यांचे आजोबा दिवंगत कचरुलाल आबड हे हिंदू अविभक्त कुटुंबाचे कर्ता होते. सर्व्हे क्र. ५५४ मधील ५ एकर जमिनीवरून आबड कुटुंब आणि त्यांची बहीण संध्या राजेंद्र डागा यांच्यात तब्बल १९८६ पासून दिवाणी न्यायालयात वाद सुरू आहे. एप्रिल २०२२ मध्ये दिवाणी अपील फेटाळले गेल्यानंतर आरोपींनी या संधीचा गैरफायदा घेतला आणि एक सुनियोजित फसवणुकीचा कट रचला.

कसा रचला फसवणुकीचा कट?

संध्या डागा यांनी जमिनीवर प्रत्यक्ष ताबा नसतानाही २० ऑगस्ट २०२१ रोजी आशिष अशोक छाजेड यांच्या नावाने एक बनावट जनरल पॉवर ऑफ अटर्नी तयार केली. त्यानंतर तत्कालीन भूमी अभिलेख उपअधीक्षक रवींद्र मुथा यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे ६ मे २०२२ रोजी कोणतीही कायदेशीर नोटीस न देता आबड कुटुंबाचे नाव प्रॉपर्टी कार्डवरून काढून संध्या डागा यांचे नाव चढवले. त्याच दिवशी सेवानिवृत्त दुय्यम निबंधक बद्रीनाथ बी. वाडेकर यांनी कायदेशीर प्रक्रियेकडे दुर्लक्ष करून या जमिनीचे चार वेगवेगळे विक्री करारनामे नोंदवले.

न्यायालयाने काय आढळले?

न्यायाधीश आर. एम. देवर्षी यांनी पोलीस अहवाल आणि कागदपत्रांची सखोल पडताळणी केली असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. प्रॉपर्टी कार्डशी संबंधित मूळ सरकारी फाईलच रेकॉर्ड रूममधून गायब असल्याचे निदर्शनास आले. विक्री करारनाम्यासोबत जोडलेले ले-आउट नकाशे आणि नगररचना विभागाच्या अधिकृत नकाशे यांच्यात मोठी तफावत आढळली. तसेच वाडेकर यांनी रद्द झालेले पीआर कार्ड जोडल्याचेही स्पष्ट झाले. न्यायाधीशांनी नमूद केले की हा केवळ दिवाणी वाद नसून बनावट कागदपत्रे तयार करून सरकारी नोंदींमध्ये फेरफार करण्याचा गंभीर फौजदारी गुन्हा आहे.

कोणावर गुन्हा दाखल?

न्यायालयाच्या आदेशानुसार कदीम जालना पोलिसांनी खालील ५ जणांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ४२०, ४६७, ४६८, १२०-बी आणि ३४ अन्वये गुन्हा नोंदवला आहे —

संध्या राजेंद्र डागा (रा. हिंगणघाट, जि. वर्धा), राजेंद्र सोभागमल डागा (रा. हिंगणघाट, जि. वर्धा), आशिष अशोक छाजेड (रा. जालना), तत्कालीन भूमी अभिलेख उपअधीक्षक रवींद्र मुथा (जालना) आणि सेवानिवृत्त दुय्यम निबंधक बद्रीनाथ बी. वाडेकर (जालना).

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे करत आहेत. फिर्यादीच्या बाजूने ॲड. दर्शित आबड यांनी काम पाहिले असून त्यांना ॲड. आशिष जाधवर आणि ॲड. पी. डब्ल्यू. कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.

महसूल आणि नोंदणी विभागातील अधिकाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल झाल्याने जिल्हा प्रशासनात मोठी खळबळ उडाली असून हे प्रकरण जालना जिल्ह्यातील सर्वात मोठ्या जमीन फसवणूक प्रकरणांपैकी एक मानले जात आहे.