जालना येथे अवैध सरिया विक्रीवर पोलिसांची मोठी कारवाई; ₹4.41 लाखांचा मुद्देमाल जप्त
जालना (प्रतिनिधी):
जालना जिल्ह्यात अवैध व्यवसायांविरोधात पोलिसांनी कडक भूमिका घेतली असून नागेवाडी टोलनाका परिसरात अवैध लोखंडी सरिया विक्री करणाऱ्यांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. चंदनझिरा पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे टाकलेल्या धाडीत तब्बल ४ लाख ४१ हजार १०० रुपयांचा लोखंडी सरिया (रॉड्स) जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरातील अवैध व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक तेजबीरसिंग संधू यांनी अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालासाहेब पवार यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले होते. या पथकाला नागेवाडी टोलनाका, छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावर अवैधरीत्या लोखंडी सरिया विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती.
मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाड टाकली. या कारवाईदरम्यान नवनाथ पांडुरंग गवळी (रा. चंदनझिरा, जालना) हा व्यक्ती विविध स्टील कंपन्यांचा सरिया बेकायदेशीररीत्या साठवून विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात लोखंडी सरिया जप्त केला. जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत सुमारे ₹4.41 लाख इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध चंदनझिरा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अमलदार साई पवार करत असून, या अवैध व्यवसायामागे आणखी कोणी आहे का, याचा शोध घेतला जात आहे.
ही संपूर्ण कारवाई पोलिस अधीक्षक तेजबीरसिंग संधू तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक नीता तामधर, मनसूब वेताळ तसेच पोलीस कर्मचारी प्रशांत देशमुख, कृष्णा तंगे, रविंद्र देशमुख आणि चालक सुभाष नागरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
जालना जिल्ह्यात अवैध धंद्यांवर लगाम घालण्यासाठी पोलिसांची ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, पुढील काळात अशाच प्रकारच्या धडक मोहिमा अधिक तीव्र केल्या जाणार असल्याचे संकेत पोलिसांकडून देण्यात आले आहेत.
Also Read : ऑनलाइन तलवार मागवून फिरणाऱ्या तरुणावर पोलिसांची कारवाई | ₹8,400 ची शस्त्रे जप्त

0 टिप्पण्या