जालन्यात चंदनझिरा पोलिसांची मोठी कारवाई; ३३.५ लाखांचा गुटखा जप्त, दोघे गजाआड

 Jalna Police Raid: जालन्यात चंदनझिरा पोलिसांची मोठी कारवाई; ३३.५ लाखांचा गुटखा जप्त, दोघे गजाआड

Jalna Police Chandanzira Gutkha Raid Action 2026

जालना: जालना जिल्ह्यातील चंदनझिरा पोलिसांनी एक मोठी आणि धडक कारवाई करत तब्बल ३३ लाख ५० हजार ५१० रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधित पानमसाला आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले वाहन जप्त केले आहे. पोलीस अधीक्षक श्री. तेघबीर सिंग संधू यांच्या मार्गदर्शनाखाली बदनापूर परिसरातील सोमठाणा फाटा येथे हा सापळा रचण्यात आला होता. या कारवाईमुळे जालना जिल्ह्यात बेकायदेशीर गुटखा तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

बुरहानपूरहून येत होता घातक गुटखा

महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला आणि मानवी शरीरास अत्यंत घातक असलेला 'राजनिवास', 'विमल' कंपनीचा गुटखा, जाफरानी जर्दा आणि 'वि-०१' तंबाखूचा मोठा साठा मध्य प्रदेशातील बुरहानपूर येथून जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील किनगाव फाटा भागात अवैध विक्रीसाठी येत असल्याची गुप्त व खात्रीशीर माहिती पोलीस अधीक्षक श्री. तेघबीर सिंग संधू यांना मिळाली होती. माहिती मिळताच त्यांनी चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. बाळासाहेब पवार यांना तात्काळ कारवाईच्या सूचना दिल्या.

सोमठाणा फाटा येथे फिल्मी स्टाईल सापळा

पोलीस निरीक्षकांच्या सूचनेवरून सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहा करेवाड, पोलीस उपनिरीक्षक रवी देशमाने, पोलीस हेड कॉन्स्टेबल कृष्णा तंगे आणि पोलीस अंमलदार नवनाथ पाटील यांचे एक विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकाने २० मे २०२६ रोजी दुपारी ३:५० वाजेच्या सुमारास बदनापूर तालुक्यातील सोमठाणा फाटा येथे दबा धरून सापळा लावला. बुरहानपूरहून गुटखा भरून आलेली संशयास्पद महिंद्रा बोलेरो पिकअप गाडी (क्रमांक MH-21 BH-4732) तिथे येताच पोलिसांनी ती अडवली.

गाडीची तपासणी केली असता, त्यात पोलिसांना खालील मुद्देमाल आढळून आला:

  • ९,६०,०००/- रुपये किमतीचा विमल पान मसाला

  • ६,२४,०००/- रुपये किमतीचा केशरयुक्त विमल पान मसाला

  • ५,०६,२५०/- रुपये किमतीचा राज निवास सुगंधित पान मसाला

  • ३,८८,८००/- रुपये किमतीचा के.एन. १ जाफरानी जर्दा

  • ७१,४६०/- रुपये किमतीची वि १ तंबाखू (किंग पॅक व बिग तंबाखू)

  • ८,००,०००/- रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची बोलेरो पिकअप गाडी

  • एकूण जप्त मुद्देमाल: ३३,५०,५१०/- रुपये

दोन आरोपी ताब्यात, मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू

पोलिसांनी या कारवाईत गाडीतील दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. ऋषिकेश काकासाहेब कताडे (वय २६, रा. खांडी अंतरवाली, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) आणि अशोक शिवाजी तायडे (वय ३०, रा. रामसगाव, ता. घनसावंगी, जि. जालना) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींकडे अधिक चौकशी केली असता, हा गुटखा अंबड तालुक्यातील जामखेड येथील ताराचंद भागुजी भोजने याने विक्रीसाठी बुरहानपूरवरून मागवला असल्याचे निष्पन्न झाले आहे.

याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती स्नेहा करेवाड यांच्या फिर्यादीवरून बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्री. तेघबीर सिंग संधू, सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रीमती जानव्ही शेखर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली चंदनझिरा आणि बदनापूर पोलिसांच्या संयुक्त पथकाने केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या